Friday, June 2, 2017

पोहाळे येथे वक्तृत्व कला शिबिराचे आयोजन



पोहाळे येथे वक्तृत्व कला शिबिरात मार्गदर्शन करताना प्रा.टी.आर.गुरव शेजारी चंद्रकांत ‍निकाडे, प्रकाश पाटील, परशराम आंबी, एस.एस.सावंत


पोहाळे येथे वक्तृत्व कला शिबिराचे आयोजन


उत्तम वक्ता होण्यासाठी प्रथम उत्तम श्रोता व उतम वाचक होता आले पाहिजे. स्वयंपाक हा जसा करता करता येतो. सराव करुन खेळ जमतो. रियाज करुन गाणे जमते, तालिम करुन नाटक जमते तसेच श्रवण, वाचन, पुर्नलेखन, मनन, चिंतन करुन वक्तृत्व जमते असे प्रतिपादन न्यू कॉलेजचे माजी उपप्रचार्य प्रा.टी.आर.गुरव यांनी केले. ते नवनाथ हायस्कूल व जागृती वाचनालय पोहाळे यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय “वक्तृत्व कला ” शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी  बालसाहित्यिक चंद्रकांत ‍निकाडे यांनीही मार्गदर्शन केले.
प्रा.गुरव पुढे म्हणाले- आज बहुतेक जणांना मरणाची जेवढी भीती वाटत नाही तेवढी सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्याची वाटते. बोलणे हे साहित्यांचे पहिले रुप आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रथम करा. भाषण लिहिल्या शिवाय बोलू नये. जसे खाल्लेले पचविलया शिवाय माणसाची प्रकृत् सुदृढ होत नाही, तसे वाचलेलेही पचवावे लागते. काय वाचले, कुठे वाचले, कशात वाचले याच्या नोंदी ठेवण्याची सवय असेल तर एखादया विषयाची व्याख्यानासाठी तयारी करताना त्याचा खुप फायदा होतो. “सर्वसारसंग्रह” या नावाच्या टिपण वहीने सावरकरांचा  वक्तृत्वाचा पाया मजबूत केला होता. वक्तृत्व कसे करावे, कोणती पथ्ये पाळावीत याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. प्रचंड वेगाने बोलणारे वक्ते स्वत:चे आणि श्रोत्यांचेही नुकसान करतात. वक्त्याच्या ठायी, शब्दशक्ती, विचार शक्ती, स्मरणशक्ती याचबरोबर एक अवधानशक्ती असली पाहिजे. आपण कुठे बोलतो आहोत, श्रोत्यांची मानसिकता कशी आहे. समारंभाचा उददेश काय आहे याचे आकलन वक्त्याला झाले पाहिजे.

यावेळी प्रकाश पाटील, भिवाजी काटकर, प्रकाश ठाणेकर, परशराम आंबी, सावंता मगदुम, विजय एकशिंगे, डी.जी.सुतार, एस.एस.सावंत यांच्यासह या शिबिरांत शालेय, महाविदयालयीन विदयार्थी, शिक्षक, पालक मोठया संख्याने उपस्थित होते. सुत्रसंचालन अकांक्षा ठाणेकर, प्रास्ताविक व स्वागत क्रांती बेनाडे तर आभार गायत्री गुरव यांनी मानले.

No comments:

Post a Comment