Friday, May 17, 2019
शरीराला व्यायाम, मेंदुला वाचन महत्त्वाचे.
शरीराला व्यायाम, मेंदुला वाचन महत्त्वाचे.
काळानुसार वाचनाची माध्यमे बददली असली तरी
वाचनाचे महत्त्व कमी झालेले नाही. शरीरासाठी जसा व्यायाम गरजेचा असतो तसेच मेंदूसाठी
वाचन महत्त्वाचे असते. वाचन संस्कृती, ही माणसाला जगायला शिकविते. चांगले साहित्य वाचकावर
संस्कार घडवते. पुस्तकांशी मैत्री झाली तर वैचारिक बैठक तयार होते. मागच्या
पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे. अशी तक्रार सर्वच थरातून वाढते
आहे. आज वाचनासाठी अनेक उत्तम साधने हातात उपलब्ध असूनही तरुण पिढी वाचनापासून दूर
जात आहे. वाचन हे केवळ मनोरंजनासाठी नसावे तर ज्ञान प्राप्तीसाठी असावे मार्गारेट
फुलर म्हणतात की TODAY
A Reader Tomorrow Leader
कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल
तर तुम्हाला सतत त्या क्षेत्रातील नवेनवे ज्ञान , नवी नवी माहिती आणि अदयावत कौशल्ये
आत्मसात करावी लागतील.त्यासाठी वाचनाला पर्याय नाही. भारताचे माजी राष्ट्रपती
डॉ.ए.पी.जे अब्दूल कलाम म्हणतात “ पुस्तकाच्या सहवासात मला ज्ञानाबरोबर नेहमीच
आनंद मिळालाय. माझा ग्रंथ संग्रहालय ही माझी सर्वांत मोठी मौल्यवान ठेव आहे आणि तेथे
व्यतीत केलेला प्रत्येक क्षण सर्वांत मौजेचा व समाधानाचा आहे. आपल्या
महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे पट्टीचे वाचक होते. दौर्यावर
असताना प्रवासात त्यांनी अनेक पुस्तके वाचल्याच्या नोंदी आहेत. उत्तमोत्तम पुस्तके
विकत घेऊन ती वाचण्याचा त्यांचा छंद होता. त्यांनी केलेला पुस्तक संग्रह त्यांच्या
रसिक वृत्तीची साक्ष देणारा आहे. म्हणूनच “ युवक वाचतील तर देश वाचेल”
साहित्य आणि कला हा समाजमनाचा आरसा आहे.
साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी वाचन फार महत्त्वाचे आहे. सततच्या वाचनामुळे आपली
बुध्दी तेज बनते. आपले अनुभव विश्व रुंदावते. बरेचजण वाचन करतात मात्र वाचलेल्या
भागावर कितीजन चिंतन करतात हा चिंतनाचा भाग आहे. काय वाचले, किती वाचले यापेक्षा
कसे वाचले हे फार महत्त्वाचे आहे. जे वाचले त्यावर सखोल चिंतन करणे, त्यावर आपले
मत व्यक्त करणे, वाचलेल्या पुस्तकांवर गुणदोषात्मक चर्चा करणे या प्रकारचे वाचन हे
उत्तम वाचन म्हणता येईल. अशा वाचनातून सर्जनशील विचार होत असतात आणि सर्जनशील
विचार म्हणजेच साहित्य निर्मितीचा मूळ पाया आहे. अशा वाचकांतून नवीन लेखक, कवी
निर्माण होत असतात. त्यांचे विचार हे समाजाला मार्गदर्शक ठरत असतात.
उत्तम वक्ता होण्यासाठी
प्रथम उत्तम श्रोता व उतम वाचक होता आले पाहिजे. स्वयंपाक हा जसा करता करता येतो.
सराव करुन खेळ जमतो. रियाज करुन गाणे जमते, तालिम करुन नाटक जमते तसेच श्रवण, वाचन, पुर्नलेखन, मनन, चिंतन करुन वक्तृत्व जमते. बोलणे हे साहित्यांचे पहिले रुप आहे. जसे
खाल्लेले पचविलया शिवाय माणसाची प्रकृत् सुदृढ होत नाही, तसे
वाचलेलेही पचवावे लागते. काय वाचले, कुठे वाचले, कशात वाचले याच्या नोंदी ठेवण्याची सवय असेल तर एखादया विषयाची
व्याख्यानासाठी तयारी करताना त्याचा खुप फायदा होतो. “सर्वसारसंग्रह”
या नावाच्या टिपण वहीने सावरकरांचा वक्तृत्वाचा
पाया मजबूत केला होता.
वाचन हा केवळ छंद न राहता तो व्यासंग होणे आवश्यक
आहे.
आदिम अवस्थेतील माणूस निसर्गलीला विस्मयचकीत होऊन
पाहत होता. कानठळया बसविणारा मेघांचा गडगडाट, थरकाप उडविणारा विजांचा चमचमाट,
धुवाधार कोळसणारा पाऊस, जंगले बेचिराख करत जाणारे वणवे हे सारे आदिम मानवांच्या आकलनाच्या
पलीकडे होते. म्हणून या सर्व निसर्गशक्तींना त्यांनी पंचमहाभूते मानले.
उत्क्रांतीमध्ये
माणूस सर्वांत दुबळा प्राणी म्हणून निर्माण झाला. माणूस माशाप्रमाणे सदैव पाण्यात
राहू शकत नाही. किंवा साध्या चिमणीप्रमाणे
त्याला उडता येत नाही. हरणाचे पाय माणसापेक्षा
कितीतरी बळकट आहेत आणि हरिण माणसापेक्षा प्रचंड वेगाने पळते. गेंडा आणि
हत्तीला निसर्गाने माणसाच्या तुलनेत प्रचंड ताकद दिली. वाघ आणि सिंह यांना
निसर्गाकडून तीक्ष्ण नखे आणि दात यांची देणगी मिळाली. साधे मांजराचे पिल्लू
अंधारात पाहू शकते. मात्र माणसाचे पाय अडखळतात. माकडाचे पिलू या झाडावरुन त्या
झाडावर सहज उडी मारते. जे माणसाला शक्य होत नाही. जन्माला आल्यावर एका दिवसाच्या
आत पाय झाडत वासरु उभे राहते, पण माणसाच्या बाळाला मात्र मान धरावयास तीन महिने
लागतात. इतका दुबळा असणारा हा माणूसप्राणी जगाचा स्वामी बनला, ही किमया झाली तरी कशी. तर ज्ञान हे माणसाचे खास
वैशिष्टये आहे. इतर प्राण्यांनी पर्यावरणाप्रमाणे स्वत:ला जूळवून घेतले. माणसाने
मात्र स्वत:च पर्यावरणाला बदलले. सर्व प्राण्यांत फक्त मनुष्य प्राण्याच्या हाताला
अंगठा लाभला. माणसाने प्रथम दहा बोटांचे अवजार केले, नंतर त्याने दगडाची अवजारे
केली. मग धातूंचा शोध लागला. नंतर धातूची अवजारे केली. माणसाचा मेंदू विकसित झाला.
माणसाला एक स्वरयंत्र व मुखपोकळी लाभली. त्याआधारे माणसाने भाषा निर्माण केली.जोपासली, वाढवली. माणसाने केवळ
ज्ञानार्जनच केले नाही तर भाषेच्या आधारे ज्ञानसंक्रमण केले. भाषा फक्त माणसाला
लाभली आहे.अन्य प्राण्यांना ती नाही.पिढी दर पिढी माणूस विकसित होत राहतो. ते केवळ
भाषेच्या जोरावर. आज मितीस जगात 7000 भाषा आहेत.भारतीय राज्यघटनेने 22 राजभाषा व
13 लिपीचा विचार केला आहे. माणसाचे पहिले लेखन हे चित्ररुप होते. तसेच
प्रारंभीच्या काळात हातवारे करुन एकमेकांशी संवाद सुरु केल्याचं सांगितलं जात.
शिष्यवृत्ती परीक्षेत यश
शिष्यवृत्ती परीक्षेत
माझी शाळेचे यश
पूर्व उच्च प्राथमिक
शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) या परीक्षेचा अंतरिम ऑनलाईन निकाल नुकताच
जाहिर झाला. यामध्ये कदमवाडी भोसलेवाडी येथील माझी शाळेच्या विदयार्थ्यांनी यश
संपादन केले. यशस्वी विदयार्थी पुढील प्रमाणे समृद्धी विजय घडशी (270), मृणाली स्नेहलकुमार तांबे (262), संजना सुभाष नारळकर (244), सुजल सागर पाटील (242), गौरी बाबासो कस्तुरे (234), गायत्री गणपती तुपूरवाडकर (226), आदित्य महेंद्र नाईक (220), साक्षी राजेश शिंदे (206), यशस्वी विदयार्थ्यांना वर्गशिक्षिका योजना पवार यांचे मार्गदर्शन
लाभले.तर संस्थापक एम.एच.मगदूम व मुख्याध्यापिका सौ.अरुणा हुल्ले यांचे प्रोत्साहन
लाभले.
दि.17.05.2019
शिष्यवृत्ती परीक्षेत
सुसंस्कार हायस्कूलचे यश
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या परीक्षेचा अंतरिम
ऑनलाईन निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये कदमवाडी भोसलेवाडी येथील सुसंस्कार हायस्कूलच्या
विदयार्थ्यांनी यश संपादन केले. यशस्वी विदयार्थी पुढील प्रमाणे सानिया शकील शेख (190),
स्वरुप तानाजी सुर्वे (186), प्रणाली प्रवीण कदम (170), श्रावणी अनिल सुंबे (162),
यश भारत काळे (162), स्नेहल सुनील शिंदे (144), प्रितेश प्रकाश कानसरे (144), यशस्वी
विदयार्थ्यांना विषयशिक्षक विजय घाटगे, सौ.शितल भिऊंगडे, सौ. शोभा कांबळे व सुहास
खतकर यांचे मार्गदर्शन लाभले. तर संस्थापक एम.एच.मगदूम व मुख्याध्यापक विजय भोगम यांचे प्रोत्साहन लाभले.
दि.17.05.2019
Wednesday, December 5, 2018
संजय कळके यांना नेशन बिल्डर आदर्श शिक्षक पुरस्कार
सुसंस्कार हायस्कूल कदमवाडी येथील शिक्षक संजय कळके व सौ. राणी कळके यांना नेशन बिल्डर आदर्श शिक्षक पुरस्कार देताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रशासानाधिकारी शंकर यादव व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरीटेजचे प्रेसिडिंट हर्षवर्धन तायवाडे पाटील, सेक्रेटरी राहूल गांधी, असिस्टंट गव्हर्नर प्रसन्ना देशिंगकर,
संजय कळके यांना नेशन बिल्डर आदर्श शिक्षक पुरस्कार
कोल्हापूर- दि.५
डिसेंबर २०१८
सुसंस्कार हायस्कूल कदमवाडी शाळेचे गणित
विज्ञान व तंत्रस्नेही शिक्षक संजय पंडित कळके यांना रोटरी इंडिया लिटरसी मिशन
अंतर्गत दिला जाणारा “नेशन बिल्डर आदर्श शिक्षक पुरस्कार” देवून गौरविण्यात आले.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रशासानाधिकारी शंकर यादव व रोटरी क्लब ऑफ
कोल्हापूर हेरीटेजचे प्रेसिडिंट हर्षवर्धन तायवाडे पाटील, सेक्रेटरी राहूल गांधी,
असिस्टंट गव्हर्नर प्रसन्ना देशिंगकर, रोटेरियन अमर पाटील यांच्या हस्ते हा
पुरस्कार देण्यात आला. त्यांना शाळेचे संस्थापक एम.एच.मगदुम, मुख्याध्यापक विजय
भोगम यांचे मार्गदर्शन लाभले. रेसिडन्सी हॉल ताराबाई पार्क कोल्हापूर येथे
कार्यक्रम झाला. कार्यक्रमास डॉ.अभिजीत वज्रमुष्टी, प्रशांत मेहता, मिलिंद करमळकर,
किशोर परमार, भरत जाधव, समीर काळे, राहूल गद्रे, सुखराज ओसवाल, धनंजय थोरात, रोहन
सावंत, राहूल बुरगे, कुमार परमार व इतर रोटरी सदस्य उपस्थित होते.
श्री.कळके यांनी गेली पंधरा वर्षे कृतीयुक्त शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम राबवत गणित-विज्ञान विषयाचे अध्यापन करत इयत्ता दहावी निकालाचा गुणवत्तापूर्ण व चढता आलेख ठेवला आहे. तसेच
स्काऊट गाईड या विषय अंतर्गत त्यांच्या दहा विदयार्थ्याना राज्यपाल पुरस्कार
मिळाला आहे. तसेच ते शाळेत तंत्रस्नेही शिक्षक म्हणून काम पाहत आहे. .
रोटरीने पोलिओ निर्मूलन नंतर मोठया
प्रमाणावर हाती घेतलेले मिशन टीच याचा एक भाग आहे. टी फॉर टीचर ट्रेनिग, यामध्ये
शिक्षकांना वेगवेगळया प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाते. अध्यावत ई लर्निग, प्रौढ
शिक्षणासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. शाळा बाहय मुलांना शाळेच्या
मुख्य प्रवाहात आण्यासाठी रोटरी कार्य करत आहे. हॅपी स्कूल अंतर्गत मुलांसाठी
बेंच, क्रीडा साहित्य, शाळेचे रंग काम आदी रोटरी क्लब मार्फत केले जाते.
टीच मिशन अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक शाळेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना रोटरी राष्ट्रबांधणीचे शिल्पकार शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरहुन्नरी
शिक्षकांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहित करुन रोटरी इंडिया लिटरसी मिशन
अंतर्गत दिला जाणारा नेशन बिल्डर पुरस्कारासाठी कोणतेही शिफारसपत्र किंवा अर्ज दयावा लागत नाही. यामध्ये एक प्रकार
असा आहे की मुले शिक्षकांना मार्क देतात. राजकारण विरहित हा पुरकार दिला जातो हे
या पुरस्काराचे वैशिष्टय आहे.
फोटो ओळ-
सुसंस्कार हायस्कूल कदमवाडी येथील शिक्षक
संजय कळके व सौ. राणी कळके यांना नेशन बिल्डर आदर्श शिक्षक पुरस्कार देताना
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रशासानाधिकारी शंकर यादव व रोटरी क्लब ऑफ
कोल्हापूर हेरीटेजचे प्रेसिडिंट हर्षवर्धन तायवाडे पाटील, सेक्रेटरी राहूल गांधी,
असिस्टंट गव्हर्नर प्रसन्ना देशिंगकर,
Thursday, June 7, 2018
Sunday, July 16, 2017
संजय कळके
स्वातंत्रदिन उत्साहात साजरा
कोल्हापूर-
भोसलेवाडी कदमवाडी येथील सुसंस्कार शिक्षण मंडळ
संचलित माझी शाळा, सुसंस्कार हायस्कूल, अभिनव बालक मंदिर यांच्या संयुक्तपणे 71 वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
माजी सैनिक संतोष दादू पाटील यांच्या
हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी सुसंस्कार शिक्षण मंडळाचे संस्थापक
एम.एच.मगदुम, सचिव रियाज मगदुम, संचालक डॉ. अब्दुलखालिक खान, भरत लाटकर, नगरसेविका
सौ. कविता माने, बाळासाहेब गवाणी, चंदसेन जाधव, अशोक शेवडे, अशोक चौगले, मुख्याध्यापक
विजय भोगम, माझी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा हुल्ले यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी,
शिक्षक, कर्मचारी व विदयार्थी उपस्थित
होते.
स्वतंत्रदिना निमित्त विदयार्थ्याना शालेय
युनिफॉर्मचे वाटप
कोल्हापूर-
स्वतंत्रदिना निमित्त माझी शाळा, सुसंस्कार
हायस्कूल, अभिनव बालक मंदिर या शाळेतील शंभरपेक्षा
अधिक गरीब व गरजू विदयार्थ्याना शालेय युनिफॉर्मचे वाटप माजी सैनिक संतोष पाटील
यांच्या हस्ते करण्यात आले. साने गुरुजी
सामाजिक सेवा संस्था व शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांच्या संयुक्तपणे हे शालेय युनिफॉर्म
विदयार्थ्याना देण्यात आले.
यावेळी साने गुरुजी सामाजिक सेवा संस्थेचे
अध्यक्ष एम.एच.मगदुम, संचालक अशोक चौगले, चंद्रसेन जाधव, बाळासाहेब गवाणी,चिटणीस के.ए.
सिदनाळे, सुसंस्कार शिक्षण मंडळाचे सचिव रियाज मगदुम, संचालक डॉ. अब्दुलखालिक खान,
भरत लाटकर, मुख्याध्यापक विजय भोगम, माझी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा हुल्ले
यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते.
Sunday, July 9, 2017
माझी शाळेत गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार
भोसलेवाडी येथील माझी शाळेत गुणवंत विदयार्थ्याचा सत्कार करताना
महापौर हसिना फरास, डॉ. बी.एम. हिर्डेकर, संस्थापक एम.एच.मगदुम, नगरसेविका
सौ.सिमा कदम, कविता माने, स्मिता माने, अर्चना पागर,
माझी शाळेत गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार
कदमवाडी भोसलेवाडी येथील माझी शाळेच्या गुणवंत विदयार्थ्याचा
सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास तर प्रमुख पाहुणे कुलसचिव
डॉ.बी.एम.हिर्डेकर होते. पाचवी शासकीय स्कॉलरशिप परीक्षेमध्ये राज्यात तेरावी
आलेली विदयार्थीनी सुरेखा कस्तुरे ,जिल्हा यादीत आलेले आठ विदयार्थी तसेच दहावी
परीक्षेत गुणाक्रमे उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्याचा व त्यांच्या पालकांचा सत्कार
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थापक एम.एच.मगदुम, भागातील नगरसेविका
सौ.सिमा कदम, कविता माने, स्मिता माने, अर्चना पागर, अखलाख अन्सारी, सौ.सुहासिनी
वठारकर, बाळासाहेब गवाणी, हसन देसाई, भरत लाटकर, वसंत पाठक, सुनीलकुमार सरनाईक,
डॉ.जे.बी.शिंदे, संतोष पाटील, चंद्रसेन जाधव, मुख्याध्यापक विजय भोगम, माझी
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणा हुल्ले, सर्व शिक्षक, शिक्षकत्तरे कर्मचारी
यांच्यासह भागातील पालक व मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी डॉ.बी.एम.
हिर्डेकर म्हणाले माझी शाळेचे घोषवाक्य असे आहे, आम्हाला कोणत्याही दर्जाचे मुल
दया त्याला आम्ही उत्तम दर्जाला नेवून ठेवू. त्याला चांगला नागरिक करु. गुणवत्तापूर्ण
शिक्षण देउन चांगल्या दर्जाचे तरुण तयार करणे हे शाळेचे वैशिष्टये आहे. नविने
आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आजच्या मुलांच्या मन, मेंदू आणि मनगटात आहे. आजचा
विदयार्थी काळाची पावले ओळखून ते आव्हान पेलू पहात आहे. त्याच्या सामर्थ्याला आणि
बौध्दिकतेला बळ देण्याचे काम माझी शाळा करत आहे. विदयार्थ्यांनी जागतिक पातळीवर
चमकण्याचा प्रयत्न करावा. आपले ज्ञान नेहमी अदयावत करुन आव्हानात्मक संधीना सामोर
जा. त्यासाठी थोरामोठयांची आत्मचरित्रे वाचा ती नेहमी प्रेरणादायी ठरतील असेही
त्यांनी सांगितले.
यावेळी स्कॉलरशीप
मार्गदर्शक शिक्षिका सौ. मनिषा खवणेकर यांचा पालकांनी सत्कार केला. तसेच शाळेत
वर्षभर रजा न काढलेले व जादा रविवार अध्यपन
केलेल्या शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. स्वागत व
प्रास्ताविक संस्थापक एम.एच.मगदुम, सुत्रसंचालन सागर पाटील तर आभार अशोक कांबळे
यांनी मानले.
चौकट-
स्कॉलरशिप
परीक्षेत राज्यात तेरावी आलेली सुरेखा कस्तुरे या विदयार्थीनीच्या पालकांची आर्थीक
परिस्थिती गरीब असल्याने ती पदवीधर होईपर्यंत तिचा शैक्षणिक खर्च करणार असल्याचे
डॉ.हिर्डेकर यांनी सांगितले.
Subscribe to:
Posts (Atom)

