Friday, May 17, 2019

Sanjay Kalake



शरीराला व्यायाम, मेंदुला वाचन महत्त्वाचे.


शरीराला व्यायाम, मेंदुला वाचन महत्त्वाचे.
काळानुसार वाचनाची माध्यमे बददली असली तरी वाचनाचे महत्त्व कमी झालेले नाही. शरीरासाठी जसा व्यायाम गरजेचा असतो तसेच मेंदूसाठी वाचन महत्त्वाचे असते. वाचन संस्कृती, ही माणसाला जगायला शिकविते. चांगले साहित्य वाचकावर संस्कार घडवते. पुस्तकांशी मैत्री झाली तर वैचारिक बैठक तयार होते. मागच्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे. अशी तक्रार सर्वच थरातून वाढते आहे. आज वाचनासाठी अनेक उत्तम साधने हातात उपलब्ध असूनही तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. वाचन हे केवळ मनोरंजनासाठी नसावे तर ज्ञान प्राप्तीसाठी असावे मार्गारेट फुलर म्हणतात की TODAY A Reader Tomorrow Leader
कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सतत त्या क्षेत्रातील नवेनवे ज्ञान , नवी नवी माहिती आणि अदयावत कौशल्ये आत्मसात करावी लागतील.त्यासाठी वाचनाला पर्याय नाही. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दूल कलाम म्हणतात “ पुस्तकाच्या सहवासात मला ज्ञानाबरोबर नेहमीच आनंद मिळालाय. माझा ग्रंथ संग्रहालय ही माझी सर्वांत मोठी मौल्यवान ठेव आहे आणि तेथे व्यतीत केलेला प्रत्येक क्षण सर्वांत मौजेचा व समाधानाचा आहे. आपल्या महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे पट्टीचे वाचक होते. दौर्यावर असताना प्रवासात त्यांनी अनेक पुस्तके वाचल्याच्या नोंदी आहेत. उत्तमोत्तम पुस्तके विकत घेऊन ती वाचण्याचा त्यांचा छंद होता. त्यांनी केलेला पुस्तक संग्रह त्यांच्या रसिक वृत्तीची साक्ष देणारा आहे. म्हणूनच “ युवक वाचतील तर देश वाचेल”
साहित्य आणि कला हा समाजमनाचा आरसा आहे. साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी वाचन फार महत्त्वाचे आहे. सततच्या वाचनामुळे आपली बुध्दी तेज बनते. आपले अनुभव विश्व रुंदावते. बरेचजण वाचन करतात मात्र वाचलेल्या भागावर ‍कितीजन चिंतन करतात हा चिंतनाचा भाग आहे. काय वाचले, किती वाचले यापेक्षा कसे वाचले हे फार महत्त्वाचे आहे. जे वाचले त्यावर सखोल चिंतन करणे, त्यावर आपले मत व्यक्त करणे, वाचलेल्या पुस्तकांवर गुणदोषात्मक चर्चा करणे या प्रकारचे वाचन हे उत्तम वाचन म्हणता येईल. अशा वाचनातून सर्जनशील विचार होत असतात आणि सर्जनशील विचार म्हणजेच साहित्य निर्मितीचा मूळ पाया आहे. अशा वाचकांतून नवीन लेखक, कवी निर्माण होत असतात. त्यांचे विचार हे समाजाला मार्गदर्शक ठरत असतात.  
उत्तम वक्ता होण्यासाठी प्रथम उत्तम श्रोता व उतम वाचक होता आले पाहिजे. स्वयंपाक हा जसा करता करता येतो. सराव करुन खेळ जमतो. रियाज करुन गाणे जमते, तालिम करुन नाटक जमते तसेच श्रवण, वाचन, पुर्नलेखन, मनन, चिंतन करुन वक्तृत्व जमते. बोलणे हे साहित्यांचे पहिले रुप आहे. जसे खाल्लेले पचविलया शिवाय माणसाची प्रकृत् सुदृढ होत नाही, तसे वाचलेलेही पचवावे लागते. काय वाचले, कुठे वाचले, कशात वाचले याच्या नोंदी ठेवण्याची सवय असेल तर एखादया विषयाची व्याख्यानासाठी तयारी करताना त्याचा खुप फायदा होतो. सर्वसारसंग्रहया नावाच्या टिपण वहीने सावरकरांचा  वक्तृत्वाचा पाया मजबूत केला होता.
वाचन हा केवळ छंद न राहता तो व्यासंग होणे आवश्यक आहे.
आदिम अवस्थेतील माणूस निसर्गलीला विस्मयचकीत होऊन पाहत होता. कानठळया बसविणारा मेघांचा गडगडाट, थरकाप उडविणारा विजांचा चमचमाट, धुवाधार कोळसणारा पाऊस, जंगले बेचिराख करत जाणारे वणवे हे सारे आदिम मानवांच्या आकलनाच्या पलीकडे होते. म्हणून या सर्व निसर्गशक्तींना त्यांनी पंचमहाभूते मानले.
     उत्क्रांतीमध्ये माणूस सर्वांत दुबळा प्राणी म्हणून निर्माण झाला. माणूस माशाप्रमाणे सदैव पाण्यात राहू शकत नाही.  किंवा साध्या चिमणीप्रमाणे त्याला उडता येत नाही. हरणाचे पाय माणसापेक्षा  कितीतरी बळकट आहेत आणि हरिण माणसापेक्षा प्रचंड वेगाने पळते. गेंडा आणि हत्तीला निसर्गाने माणसाच्या तुलनेत प्रचंड ताकद दिली. वाघ आणि सिंह यांना निसर्गाकडून तीक्ष्ण नखे आणि दात यांची देणगी मिळाली. साधे मांजराचे पिल्लू अंधारात पाहू शकते. मात्र माणसाचे पाय अडखळतात. माकडाचे पिलू या झाडावरुन त्या झाडावर सहज उडी मारते. जे माणसाला शक्य होत नाही. जन्माला आल्यावर एका दिवसाच्या आत पाय झाडत वासरु उभे राहते, पण माणसाच्या बाळाला मात्र मान धरावयास तीन महिने लागतात. इतका दुबळा असणारा हा माणूसप्राणी जगाचा स्वामी बनला, ही  किमया झाली तरी कशी. तर ज्ञान हे माणसाचे खास वैशिष्टये आहे. इतर प्राण्यांनी पर्यावरणाप्रमाणे स्वत:ला जूळवून घेतले. माणसाने मात्र स्वत:च पर्यावरणाला बदलले. सर्व प्राण्यांत फक्त मनुष्य प्राण्याच्या हाताला अंगठा लाभला. माणसाने प्रथम दहा बोटांचे अवजार केले, नंतर त्याने दगडाची अवजारे केली. मग धातूंचा शोध लागला. नंतर धातूची अवजारे केली. माणसाचा मेंदू विकसित झाला. माणसाला एक स्वरयंत्र व मुखपोकळी लाभली. त्याआधारे माणसाने भाषा  ‍निर्माण केली.जोपासली, वाढवली. माणसाने केवळ ज्ञानार्जनच केले नाही तर भाषेच्या आधारे ज्ञानसंक्रमण केले. भाषा फक्त माणसाला लाभली आहे.अन्य प्राण्यांना ती नाही.पिढी दर पिढी माणूस विकसित होत राहतो. ते केवळ भाषेच्या जोरावर. आज मितीस जगात 7000 भाषा आहेत.भारतीय राज्यघटनेने 22 राजभाषा व 13 लिपीचा ‍विचार केला आहे. माणसाचे पहिले लेखन हे चित्ररुप होते. तसेच प्रारंभीच्या काळात हातवारे करुन एकमेकांशी संवाद सुरु केल्याचं सांगितलं जात.

शिष्यवृत्ती परीक्षेत यश


शिष्यवृत्ती परीक्षेत माझी शाळेचे यश  
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) या परीक्षेचा अंतरिम ऑनलाईन निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये कदमवाडी भोसलेवाडी येथील माझी शाळेच्या विदयार्थ्यांनी यश संपादन केले. यशस्वी विदयार्थी पुढील प्रमाणे समृद्धी ‍विजय घडशी (270), मृणाली स्नेहलकुमार तांबे (262), संजना सुभाष नारळकर (244), सुजल सागर पाटील (242), गौरी बाबासो कस्तुरे (234), गायत्री गणपती तुपूरवाडकर (226), आदित्य महेंद्र नाईक (220), साक्षी राजेश शिंदे (206), यशस्वी विदयार्थ्यांना वर्गशिक्षिका योजना पवार यांचे मार्गदर्शन लाभले.तर संस्थापक एम.एच.मगदूम व मुख्याध्यापिका सौ.अरुणा हुल्ले यांचे प्रोत्साहन लाभले.
                                           दि.17.05.2019

शिष्यवृत्ती परीक्षेत सुसंस्कार हायस्कूलचे यश  
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या परीक्षेचा अंतरिम ऑनलाईन निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये कदमवाडी भोसलेवाडी येथील सुसंस्कार हायस्कूलच्या विदयार्थ्यांनी यश संपादन केले. यशस्वी विदयार्थी पुढील प्रमाणे सानिया शकील शेख (190), स्वरुप तानाजी सुर्वे (186), प्रणाली प्रवीण कदम (170), श्रावणी अनिल सुंबे (162), यश भारत काळे (162), स्नेहल सुनील शिंदे (144), प्रितेश प्रकाश कानसरे (144), यशस्वी विदयार्थ्यांना विषयशिक्षक विजय घाटगे, सौ.शितल भिऊंगडे, सौ. शोभा कांबळे व सुहास खतकर यांचे मार्गदर्शन लाभले. तर संस्थापक एम.एच.मगदूम व  मुख्याध्यापक ‍विजय भोगम यांचे प्रोत्साहन लाभले.
                                                      दि.17.05.2019