Sunday, February 19, 2017

शाईपेन आता विस्मृतीत


शाईपेन आता विस्मृतीत
स्वस्त किमत तसेच सहज उपलब्ध होत असल्यामुळे बहुसंख्य शालेय विद्यार्थी लिखाणासाठी सर्रास बॉलपेन वापरू लागले आहेत. एके काळी सुवाच्य, वळणदार अक्षरासाठी वापरला जाणारा शाईचा पेन आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. विद्यार्थ्यांनी शाईचा पेन वापरावा याबाबत शिक्षक, पालकही फारसे आग्रही दिसत नाहीत.
सध्याच्या युगात शाईपेनचा वापर दुर्मिळ झाला आहे. पूर्वी शाळांमधून बॉलपेन वापर करू दिला जात नसल्याने सर्वच विद्यार्थी शाईचा पेन वापरात. त्यामुळे अक्षर वळणदार सुंदर असायचे. जुन्या काळातील सर्वच लिखाण शाई मध्ये झालेले आहे. त्यासाठी त्या काळात बोरू, टाक यांचाही वापर केला जात असे. त्यामुळे देवनागरी लिपीतील लेखन सुवाच्य दिसायचे. शाई पेनचा वापर होऊ लागल्यानंतर टाकाचे, बोरुचे लिखाण काळाच्या ओघात मागे पडले. आता तर संगणकाच्या युगात काही अपवाद वगळता शिक्षकदेखील शाईपेनचा वापर करताना दिसत नाहीत. स्वाभाविकच ते शाईच्या पेनाच्या वापराविषयी आग्रही नाहीत. शैक्षणिक साहित्याची खरेदी करताना पालकही पाल्याच्या आग्रहाखातर कंपनीचे नाव सांगूनच बॉलपेन खरेदी करताना दिसतात. सुंदर हस्ताक्षर हा एक दागिना आहे. यासारख्या सुविचारांचाही विसर सर्वांनाच पडू लागला आहे. खराब हस्ताक्षर हे अर्धवट शिक्षणाचे प्रतीक आहे. असे महात्मा गांधी म्हणत. आता मात्र हाताने लिहिण्याचा अनेकजण कंटाळा करताना दिसतात. पूर्वी प्राथमिक शाळांतून जाणीवपूर्वक हस्ताक्षराचे धडे दिले जात. सध्या सुलेखन वहीचा वापरही अभावानेच केला जात असल्याचे दिसते. पंधरा वर्षापूर्वी बिना एअर मेल, क्यामलीण आदि कंपन्यांनी बनविलेल्या शाईच्या पेनाना मोठी मागणी होती. बोल्पेंचा वापर तेव्हा तुरळक होता. आता मात्र मागणी नसल्याने शाई पेन विक्रीसाठी ठेवायलाही परवडत नसल्याचे विक्र्त्यांचे म्हणणे आहे.
सध्या वह्यांचा कागदही सुमार दर्जाचा असल्याने त्यावर शाईच्या पेनाने लेखन करणे योग्य होत नाही. शाईपेनाच्या तुलनेत बॉलपेनचा वापर करणे सोयीचे जाते. याशिवाय स्वस्त किमतीत, तसेच आकर्षक स्वरुपात जेलपेन, बॉलपेन मिळू लागले आहेत. दुराचीत्रावानिवरील त्यांच्या जाहिराती मुलांना भुरळ घालतात. याशिवाय शाईची दौत खरेदी करणे, पेनात शाई भरणे हे विद्यार्थ्यांना धावत्या जगात कटकटीचे वाटू लागले आहेत. या पर्स्व्भूमीवर काही शाळांमधून मात्र शाईपेणच्या वापराबाबत शिक्षक आग्रही असल्याचे दिसतात. हस्ताक्षर सुधार प्रकल्पदेखील काही ठिकाणी राबविले जात आहेत. असे असले तरी सध्या शाईपेन इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत